जयपूर: केरळची 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब जिंकला आहे. राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात तिच्या नावाची विजेती म्हणून घोषणा करण्यात आली. ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ मानिका विश्वकर्मा हिने काझियाला मुकुट परिधान करून विजेतेपदाची अधिकृत जबाबदारी तिच्याकडे सोपवली.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण 52 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अनेक टप्प्यांतील ऑडिशन, मुलाखती आणि विविध फेऱ्यांनंतर अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत तमिळनाडूची वैष्णवी गणेश, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, केरळची काझिया लिझ मेजो, गुजरातची अनुश्री सातवळेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ यांनी स्थान मिळवले होते.

अंतिम फेरीतील कामगिरीत काझियाने प्रभावी सादरीकरण केले. तिला 40 सेकंदांत समारोपाचे भाषण करण्याचे आव्हान देण्यात आले होते. हे आव्हान तिने यशस्वीपणे पूर्ण करत परीक्षकांची पसंती मिळवली. त्यानंतर तिची ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’ म्हणून निवड झाली. गुजरातची अनुश्री सातवळेकर आणि तमिळनाडूची वैष्णवी गणेश यांनी अनुक्रमे पुढील स्थान पटकावले.

स्पर्धेच्या परीक्षक मंडळात ‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेन होती. परीक्षक मंडळात सेलिना जेटली, उर्वशी रौतेला आणि रिया सिंघा यांच्यासह इतर मान्यवरांचाही समावेश होता.
काझिया लिझ मेजोच्या विजेतेपदामुळे आता तिच्यासमोर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. नोव्हेंबर 2026 मध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या 75 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत ती भारताकडून सहभागी होणार आहे. त्यामुळे तिच्या पुढील कामगिरीकडे देशभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.







