तिरुवनंतपुरम : जगभरात एमपॉक्सचे (प्रचलित नाव मंकीपॉक्स) रुग्ण वाढू लागल्याने केरळच्या आरोग्य विभागाने राज्य प्रशासनाला अलर्ट जारी केला आहे. कोरोना महामारीचा केरळमधूनच देशात शिरकाव झाला होता. त्यामुळे या नव्या महामारीबाबत केरळ सरकार वेळीच सावध झाले आहे. विमानतळांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
प्रामुख्याने एमपॉक्सचे रुग्ण आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. एखाद्या प्रवाशाला एमपॉक्सचा संसर्ग झाला असण्याची लक्षणे आढळली, तर तत्काळ त्याचे विलगीकरण करून उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. एमपॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. तो संपर्कातून पसरतो. त्यामुळे संशयित रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवणे हा संसर्ग रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
उपलब्ध उपचारांच्या मदतीने एमपॉक्सचा रुग्ण दोन ते चार आठवड्यांत बरा होतो. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एमपॉक्ससंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. आफ्रिकेतील कांगो या देशात एमपॉक्सचा उद्रेक झाला आहे. आसपासचे चार आफ्रिकन देश तसेच स्वीडन या युरोपीय देशात देखील एमपॉक्सचा संसर्ग पसरला. शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेशात एमपॉक्सचा शिरकाव झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.