दिल्ली : देशाचे मावळते सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. आज सोमवारी न्यायमुर्ती संजीव खन्ना सरन्यायाधीश पदाशी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देणार आहेत. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.
डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यानंतर न्यायमुर्ती खन्ना हे सर्वात सिनिअऱ होते. त्यामुळे त्यांना नवीन सरन्यायाधीश बनण्याचा बहुमान मिळाला आहे. ते 13 मे 2025 पर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहणार आहेत. अर्थात त्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाल सहा महिन्यांचा असणार आहे.
1960 मध्ये कायदे क्षेत्रातील प्रतिष्ठीत कुटुंबात न्यायमुर्ती संजीव खन्ना यांचा जन्म झाला आहे. त्यांचा कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास गौरवास्पद राहिला आहे. न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी 1983 मध्ये तीस हजारी न्यायालयात वकिली सुरू केली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिसही केली असून, आता पुढील सहा महिने ते देशाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.