नवी दिल्ली: जगभरात प्रसिद्ध असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कासाठी ओळखले जाते. आता मात्र, या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे चळवळीचे धडे बंद होण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठात आंदोलन केल्यास मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, असे विद्यापीठाने म्हटलं आहे.
विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या या आदेशानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जेएनयूमधील कोणत्याही शैक्षणिक किंवा प्रशासकीय इमारतीच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थ्यांनी धरणे, उपोषण, घोषणाबाजी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा निषेध केल्यास त्यांना 20 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा कॅम्पसमधून बाहेर काढले जाऊ शकते, असे आदेशात म्हटले आहे. मुख्य प्रॉक्टर कार्यालयाने या नियमावलीला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यास विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने 24 नोव्हेंबर रोजी मान्यता दिली. एवढेच नाही तर आता जेएनयू प्रशासनाच्या परवानगीशिवाय पार्टी आयोजित केल्यास दंडही आकारला जाणार आहे.