हिसार: हरियाणातील हिसारमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हिसारमधील हंसी येथे हिरो मोटरसायकल शोरूमचे मालक रवींद्र सैनी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रवींद्र सैनी दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी (जननायक जनता पार्टी) शी संबंधित होते. बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. रवींद्र सैनी यांच्याकडेही बंदूकधारी सुरक्षारक्षक होता, मात्र जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा तो शोरूममध्ये उपस्थित होता. ते रवींद्र सैनी यांच्यासोबत नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी जेजेपी नेते रवींद्र सैनी आपल्या गनमॅनला शोरूममध्ये सोडून काही कामासाठी बाहेर जात होते, तेव्हा वाटेत आलेल्या तीन दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागताच ते जमिनीवर पडले. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रवींद्र सैनी यांना तत्काळ रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आरोपींच्या शोधासाठी नाकाबंदी
सध्या पोलिसांनी रवींद्र सैनी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी शहराबाहेर पळून जाऊ नयेत, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिकारीही सक्रिय झाले आहेत.
पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत
गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला होता. पोलीस घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध घेत आहेत. हंसी, हिसारमध्ये ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला प्रेमविवाह करणाऱ्या एका जोडप्याची नराधमांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.