रांची: झारखंडमधील जामतारा येथील कालाझारिया रेल्वे स्थानकाजवळ अनेक प्रवाशांना ट्रेनने धडक दिल्याचे वृत्त आहे. या अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. मृतांच्या नेमक्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. जामतारा उपायुक्त म्हणाले की, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, जामताराचे आमदार इरफान अन्सारी यांनी सांगितले की, या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अनेक वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, किमान 12 प्रवाशांना ट्रेनने धडक दिली असून, त्यापैकी दोन ते तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
अपघात कसा झाला?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर-बंगलोर एक्स्प्रेस डाऊन मार्गावरून जात होती. वाटेत खूप धूळ होती. यामुळे चालकाला काहीच दिसत नव्हते. धुळीमुळे ट्रेनला आग लागल्याची भीती व्यक्त केली जात होती. आगीचे वृत्त समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली व ट्रेन थांबताच अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. त्याच क्षणी एक ईएमयू ट्रेन अप लाईनवर येत होती. अनेक प्रवासी यामध्ये बळी पडले.
जामतारा एसडीएम अनंत कुमार यांनी सांगितले की, ‘कालाझारिया रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेन थांबली आणि काही प्रवासी खाली उतरले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या लोकल ट्रेनने धडक दिली. काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. आरपीएफ आणि जिल्हा पोलीस शोध मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही.
मृत हे प्रवासी नाही : रेल्वे
पूर्व रेल्वेने बुधवारी संध्याकाळी उशिरा एक निवेदन जारी करून झारखंडमधील जामतारा येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत स्पष्टपणे सांगितले की, ट्रेनमध्ये आगीची कोणतीही घटना घडली नाही. पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) कौशिक मित्रा यांनी सांगितले की, विद्यासागर कासितार येथून जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२२५४ पासून किमान दोन किमी अंतरावर रुळावरून चालत असलेल्या दोन व्यक्तींना ट्रेनने धडक दिली. सध्या दोघांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.
ते म्हणाले की, या अपघातात 12 मृत्यूची झाल्याची चर्चा योग्य नाही. मृत्युमुखी पडलेले दोघे रेल्वेचे प्रवासी नसून रुळावरून चालत असताना त्यांना ट्रेनची धडक बसली. या घटनेच्या चौकशीसाठी पूर्व रेल्वेने तीन सदस्यीय जेएजी समिती स्थापन केली आहे.
बुधवारी रात्री आसनसोल विभागातील जामतारा येथील कालाझरिया रेल्वे स्थानकावर रेल्वेने अनेक प्रवाशांना चिरडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, रेल्वेने सध्या दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
#WATCH | Jharkhand: Rescue operations are underway at Kalajharia railway station in Jamtara after a train ran over several passengers. https://t.co/kVDqS0PetF pic.twitter.com/ItEVsMhzAJ
— ANI (@ANI) February 28, 2024
चंपाई सोरेन यांनी शोक व्यक्त केला
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जामतारा येथील कलझरिया स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या दु:खद बातमीने आपण दु:खी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. प्रशासनाचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो, असंही सोरेन यांनी म्हटलं आहे.