जम्मू: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १४ काश्मिरी पंडितांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापैकी विक्रमी सहा काश्मिरी पंडित हब्बा कदल विधानसभा मतदारसंघातून मैदानात आहेत. या सर्व उमेदवारांनी काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यात परत आणणे आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्याचे लक्ष्य आपल्या डोळ्यांसमोर ठेवले आहे. हब्बा कदलसह २७ मतदारसंघांसह २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या १४ काश्मिरी पंडितांपैकी ६ जणांनी हब्बा कदलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापैकी पाच जण हे मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या चिन्हावर मैदानात आहेत. हब्बा कदल मतदारसंघात अशोक कुमार भट्ट यांनी भाजपकडून, संजय सराफ यांनी लोक जनशक्ती पार्टी आणि संतोष लाबरू यांनी ऑल अलायन्स डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे.