मुंबई : एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांकडून ती मनोरुग्ण असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं असल्याची घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात मात्र त्याची पत्नी पूर्णपणे निरोगी होती. तिला कोणत्याही प्रकारचा विकार नव्हता. पीडिता माहेरी गेल्यानंतर या प्रकारचा उलगडा झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, किरतपूरला राहणाऱ्या पारुलचं आणि मुबारकपूरला राहणाऱ्या अनिल कुमारचं सुमारे पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सुरुवातीला सर्व काही छान सुरु होतं.त्यानंतर काही काळानंतर त्यांच्यातले संबंध बिघडले. आपली पत्नी आपल्याला कायदेशीर प्रकरणात अडकवू शकते, हे पती अनिलच्या लक्षात येताच त्याने तिच्याविरोधात षडयंत्र रचले.
अनिलने पारुलला दिव्यांग प्रमाणपत्र बनवून देण्याचं आश्वासन दिलं. या प्रमाणपत्रामुळे तिला सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आणि दरमहा एक हजार रुपये मिळतील, असंही तिला सांगितलं. या अमिषापोटी पारुलने प्रमाणपत्र बनवण्यास होकार दिला. अनिलने पारुलला सांगितलं, की डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उलटसुलट उत्तरं दे, जेणेकरून तिला लवकर प्रमाणपत्र मिळेल.
पत्नीला फसवून अनिलने तिला शासकीय रुग्णालयातले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नितीन कुमार यांच्याकडे नेलं. आपली पत्नी मनोरुग्ण असून, ती वेड्यासारखी वागत असल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं. डॉ. नितीन यांनी पारुलला काही प्रश्न विचारलं. अगोदरच ठरल्याप्रमाणे तिने प्रश्नांची उलटसुलट उत्तरं दिली. यामुळे डॉक्टरांनाही वाटलं, की पारुल खरोखरच मनोरुग्ण आहे.
पारुल 70 टक्के मानसिक आजारी असल्याचं दोन वर्षांसाठीचं प्रमाणपत्र डॉक्टरकडून देण्यात आलं. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पारुल तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. पतीने आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्र बनवून दिलं आहे आणि त्यामुळे सरकारी सुविधा मिळतील, अशी माहिती तिने वहिनीला दिली. मात्र, तिच्या वहिनीने प्रमाणपत्र बघितल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
आपल्याला मिळालेलं प्रमाणपत्र दिव्यांग असल्याचं नसून आपण मनोरुग्ण असल्याचं आहे, हे समजल्यानंतर पारुलला मोठा धक्का बसला. तिने कुटुंबीयांसह जिल्हा रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला आणि प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. सध्या डॉक्टरांनी तिचं म्हणणं ऐकून घेऊन प्रमाणपत्र रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. बिजनौरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कौशलेंद्र यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहित समोर येत आहे.