Israel Hamas War : नवी दिल्ली : हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धाला ‘अल्प विराम’देण्यास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तयार झालेत. त्यांनी सोमवारी रात्री त्यासंदर्भात सांगितले. दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी युद्धाला अल्प विराम देण्याचे स्पष्ट केले. हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करण्यासाठी अल्प विराम घेण्याची त्यांची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच हमासच्या तावडीतून पाच ओलिसांची सुटका झाली असून त्यामुळे उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
…म्हणून युद्धविराम घेतला
दोन दिवसांपूर्वी गाझामधील पॅलेस्टिनींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी युद्धविराम घ्यावा असे काही अरब देशांकडून आणि अमेरिकेकडून त्यांना आवाहन केले गेले होते. मात्र, त्यावेळी नेतान्याहू यांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. हमासने सर्व ओलिसांची सुटका केल्याशिवाय कोणताही युद्धविराम घेणार नाही अशी भूमिका इस्रायलकडून घेण्यात आली होती. दरम्यान, हमासच्या तावडीतून पाच ओलिसांची सुटका झाल्यानंतर उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासोबतच हमासबरोबरचे युद्ध संपल्यानंतर गाझामधील एकंदर सुरक्षेची जबाबदारी इस्रायलवरच असेल असे नेतान्याहू यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे इस्रायल गाझा पट्टीमधून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत बेंजामिन नेतन्याहू यांनी दिले.
इस्रायलचे हमासबरोबर सुरू असलेल्या या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे, अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. तर केलेकी मदत पाहता, गाझा पट्टीत आतापर्यंत मदत आणि वैद्यकीय सामग्री घेऊन ५६९ ट्रक आले आहेत. मात्र त्यामध्ये इंधनाचा समावेश नाही. इंधनाचा वापर हमासच्या अतिरेक्यांकडून केला जाईल असे कारण देत इस्रायलने गाझामध्ये इंधनपुरवठा रोखून धरला आहे.