IPL 2023 | पुणे : राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू यजुवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत सर्वोधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला आहे. चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५६ व्या सामन्यात ही कामगिरी केली.
ब्राव्होने १६१ सामन्यात १८३ विकेट घेतल्या आहेत. तर चहलने त्याला मागे टाकत केवळ १४३ सामन्यांत ही कामगिरी केली. चहल राजस्थानच्या आधी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून खेळत होता. त्याचवेळी ड्वेन ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे.
कोलकाता विरुद्ध चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात २५ धावा देऊन चार विकेट घेतल्या. चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. चहलने आयपीएलमध्ये १४३ सामन्यांत १८७ विकेट्स घेतल्या आहेत.
IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (सामने) :
यजुवेंद्र चहल (१४३) – १८७
ड्वेन ब्रावो (१६१) – १८३
पीयूष चावला (१७६) – १७४
अमित मिश्रा (१६०) – १७२
रविचंद्रन अश्विन (१९६) – १७१
दरम्यान, अवघ्या १३ चेंडूंत अर्धशतक फटकावल्यानंतर ४७ चेंडूंत नाबाद ९८ धावांची झंझावाती खेळी साकारणाऱ्या यशस्वी जैस्वालच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने केकेआरचा ४१ चेंडू व ९ गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. केकेआरला ८ बाद १४९ धावांवर रोखल्यानंतर राजस्थानने १३.१ षटकांत १ बाद १५१ धावांसह सर्व आघाड्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले.