कांकेर : कांकेर (छत्तीसगड) येथील कोयालीबेडा परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये ३ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून, इतर काही नक्षली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकांच्या अनुषंगाने घातपाताचा कट करण्याच्या बेतात असलेले काही नक्षली कांकेर येथील कोयलीबेडा परिसरातील जंगलात जमल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही नक्षल्यांचा मागोवा लागला असता, त्या दिशेने पोलीस जात असतांना अचानक अंदाधुंद गोळीबार झाला. नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना पोलिसांनी देखील गोळीबार केला. यात ३ नक्षल्यांचा खात्मा झाला असून, दोन शस्त्र देखील हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी परिसरात राबविलेल्या सर्च मोहीमेत परिसरात शस्त्रसाठा देखील आढळून आला आहे. डीआरजी आणि बीएसएफने संयुक्त ऑपरेशन राबवित नक्षलवाद्यांच्या छुप्या कारवाईचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईमध्ये सुरक्षा दलांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे कांकेरचे एसपी इंदिरा कल्याण एलेसेला यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा राखीव दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकांनी मिळून राबविलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला हे यश आले असून कोयलीबेडा परिसरातील जंगलात सुरू असलेला नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या परिसरात सध्या पोलीस तपास करत असून आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवार (ता. २४) फेब्रुवारीला सुकमा येथे देखील अशाच प्रकारची चकमक सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली होती. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी जंगलात झडती घेतली असता यात एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि काही स्फोटक साहित्यासह शस्त्र सापडून आले होते.
दरम्यान, नक्षल प्रभावित क्षेत्रात पोलिसांकडून सतत शोध मोहीम राबवली जात आहे. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची चाहूल लागताच जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत जोरदार गोळीबार सुरू केला. यावेळी सुरक्षा दलाच्या गोळ्यांना एका नक्षल्याचा बळी गेला, तर उर्वरित नक्षलवादी जंगलाच्या आडून पळून गेले. गोळीबार थांबल्यानंतर जवानांनी जंगलात शोधमोहीम राबवली, ज्यामध्ये या नक्षलवाद्याचा मृतदेह आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.