दक्षिण आफ्रिका : १९ वर्षांखालील महिला टी २० क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बलाढ्य इंग्लड संघाला धूळ चारून इतिहास रचला आहे. इंग्लड संघाला फक्त ६८ धावांवर बाद करून १९ वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आहे. भारतीय महिला संघाने इंग्लड संघाला ७ विकेट्सने मात केली आणि हा विश्वचषक आपल्या नावावर केला.
१९ वर्षांखालील महिला टी २० क्रिकेट विश्वचषकाचा अंतीम सामना दक्षिण आफिकेत झाला. या सामन्यात शेफाली वर्माच्या नेतृत्त्वात या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत अंतिम सामना गाठला. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर या संघाकडून भारतीयांचा अपेक्षा वाढल्या होत्या. या संघाने या अपेक्षा सार्थकी ठरवत या वर्षाचा पहिला विश्वचषक जिंकला.
या सामन्यात भारतीय महिला संघातील गोलंदाजीने इंग्लडच्या संपूर्ण संघाला ६८ धावांमध्ये गारद केले. भारतीय गोलंदाज तीतस साधूने ४ षटकांत केवळ ६ धावा देऊन २ विकेट्स काढल्या. तर, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. तर, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी १ विकेट काढल्या.
दरम्यान, ६९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार शेफाली वर्माने सुरुवात तर धडाकेबाज केली. मात्र, ती ११ चेंडूंमध्ये १५ धावांवर असताना बाद झाली. यामध्ये तिने १ चौकार आणि १ षटकार मारला. भारताची स्थिती २० वर २ असताना सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा यांनी प्रत्येकी २४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.