दिल्ली : देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरलेले आहे. त्यातही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे. सरकारला 100 वंदे भारत ट्रेनची निर्मिती आणि देखभालीचे तब्बल 30 हजार कोटींचे कंत्राट रद्द करावे लागले आहे. ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली होती. त्यामुळे ही योजना लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय रेल्वेने तडकाफडकी हे कंत्राट रद्द करण्यामागील कारण म्हणजे ज्या ‘अलस्ट्रोम इंडिया’ कंपनीने कंत्राटामध्ये जी सर्वात कमी बोली दाखवली होती ती किंमत अधिक असल्याचे दिसून आले. समोर आलेल्या माहितीनुसार, फ्रान्समधील मल्टीनॅशनल कंपनी असलेल्या ‘अलस्ट्रोम इंडिया’ने दिलेल्या ऑफरमध्ये एक वंदे भारत ट्रेनच्या निर्मितासाठी 150.9 कोटी रुपये खर्च येईल असे सांगण्यात आले. मात्र भारतीय रेल्वेचे एका वंदे भारतचं बजेट 140 कोटी रुपये इतकं आहे. या बजेटमध्येच भारतीय रेल्वेला वंदे भारत ट्रेनची निर्मिती करुन हवी आहे.
भारती रेल्वेने देशभरात वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या देशातील अनेक मार्गांवर ही वातानुकूलित ट्रेन सुरु असून प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. मार्गांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने रेल्वेनने मागील वर्षी 100 ट्रेनसाठी टेंडर काढले होते. त्यानुसार पुढीलवर्षी जुलै महिन्यात नव्या गाड्यांच्या प्रोटोटाईपची चाचणी घेण्याचे नियोजन होते.
कंपनीने प्रति ट्रेन150.9 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही किंमत 140 कोटींपर्यंत खाली आणण्यासाठी चर्चा सुरु होती. कंपनीकडून 145 कोटींपर्यंत किंमत कमी केलीही होती. पण त्यानंतरही रेल्वेकडून कंत्राट रद्द करण्यात आले. त्यामुळे या महत्त्वकांक्षी योजनेला धक्का बसला आहे.