नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे ‘मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट’ भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ (एमओसी) हे डीआरडीओच्या जोधपूरमधील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेले एक सूक्ष्मलहरी प्रतिगामी खास तंत्रज्ञान आहे. यामध्ये काही मायक्रॉन व्यासाचे आणि अनोखे सूक्ष्मलहरी प्रतिगामी गुणधर्म असलेले विशेष प्रकारचे तंतू एकत्र केले गेले आहेत. शत्रूकडून गोळीबार झाल्यावर हे रॉकेट निर्धारित काळासाठी आकाशात पुरेशा क्षेत्रावर सूक्ष्मलहरींचे धूसर ढग तयार करते. यामुळे ध्वनिलहरींचा शोध घेणाऱ्या प्रतिकूल धोक्यांपासून एक प्रभावी कवच तयार होते आणि शत्रूची दिशाभूल होऊन त्यांच्या हल्ल्यापासून बचाव करणे शक्य होते.
एमआर-एमओसीआरच्या टप्पा-एक चाचण्या भारतीय नौदलाच्या जहाजांवरून यशस्वीपणे पार पडल्या. यामध्ये एमओसीद्वारे निर्धारित काळासाठी आकाशात ढग तयार करण्यात आले. टप्पा-दोन चाचण्यांमध्ये, शत्रूच्या रडारच्या कक्षेत येऊन (आरसीएस) हवाई लक्ष्याच्या घटना ९० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे भारतीय नौदलाने दाखवून चाचणी यशस्वी केली आहे.