Indian Economy : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली आहे. या आर्थिक वर्षातील ही सर्वात दमदार कामगिरी ठरली आहे. मंदीच्या प्रभावाने जगभरातील अर्थव्यवस्था मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. सकल देशातंर्गत उत्पादनाची (GDP) आकडेवारी गुरुवारी सांख्यिकी विभागाने समोर आणली. त्यामुळे अनेक विकसीत देशांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेचे अंदाज पण भारतीय अर्थव्यवस्थेने मोडीत काढत आगेकूच केली आहे. केंद्र सरकारचा खर्च, अर्थ क्षेत्रातील दमदार कामगिरी, खाण आणि बांधकाम विभागामुळे हा डोंगर सहज चढता आला.
आरबीआयचा अंदाज चुकवला
भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्क्यांचा टप्पा गाठण्याचा दावा केला होता. पण हा दावा पण खोटा ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी मूसंडी मारली. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीतील प्रगतीविषयीचा अंदाज जोखला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने या आर्थिक वर्षातील पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी 6.5 टक्के तर तिसऱ्या तिमाहीसाठी 6.0 टक्के आणि अंतिम, चौथ्या तिमाहीसाठी 5.7 टक्के विकासाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेने डोळे दिपवणारी कामगिरी केली आहे.
अशी झाली वाढ
30 नोव्हेंबर रोजी भारतीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. त्यातील आकडेवारीने अनेक अर्थतज्ज्ञांना धक्का दिला. जागतिक घडामोडींचा विचार करता हा वेग अचंबित करणारा आहे. सकल देशातंर्गत उत्पादन या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 41.74 लाख कोटी रुपये होते. तर गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत (Q2 2022-23) जीडीपी 38.78 लाख कोटी रुपये होते. त्यावेळी जीडीपीची वाढ 6.2 टक्के होता. या तिमाहीत जीडीपीचा वेग 7.6 टक्के आहे.