वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तेथील भारतवंशीय समुदायाने डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या समर्थनात प्रमुख राज्यांमध्ये जमिनीस्तरावर जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी भारतीयांनी नुकतेच ‘इंडियन अमेरिकन्स फॉर हरिस’ अभियान सुरू केले आहे. यंदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस व त्यांचे प्रतिद्वंदी रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतवंशीय मतदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत आहे. यंदा बहुतांश भारतीयांनी सत्तारूढ डेमोक्रेटिक पक्षाच्या ५९ वर्षीय भारतवंशीय उमेदवार कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारासाठी भारतीयांनी नुकतेच ‘इंडियन अमेरिकन्स फॉर हॅरिस’ अभियान सुरू केले आहे. कमला हॅरिस यांच्या हाती अमेरिकेच्या प्रशासनाचे नेतृत्व देऊन त्यांना निवडून आणत नवा इतिहास रचण्याचे आवाहन भारतीयांनी केले.
या अभियानात सक्रिय सहभाग घेतलेले नॉर्थ कॅरोलिनातील व्यापारी स्वदेश चॅटर्जी म्हणाले की, अमेरिकेच्या निवडणूक आखाड्यात पहिल्यांदाच भारतवंशीय महिला उतरली आहे. कमला हॅरिस यांच्या आई भारतीय आहेत. त्या भारतीय वारसा व संस्कृतीशी जुळलेल्या आहेत. म्हणूनच आम्ही भारतीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या इतिहासात कधीच कमला नामक उमेदवाराने राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढली नाही. म्हणूनच आम्ही कमला हॅरिस यांना पसंती दिली आहे. नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्वेनिया, एरिजोना व जॉर्जिया या राज्यात हॅरिस यांना चांगली आघाडी मिळेल, असा दावा चॅटर्जी यांनी केला. स्वदेश चॅटर्जी यांना भारत-अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यात योगदान दिल्याबद्दल २००१ साली तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ने सन्मानित केले होते, हे विशेष.