नवी दिल्ली : देशात प्रथमच हात प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवयवदानाचे वाटप हे पारदर्शक पद्धतीने आणि प्राथमिकतेच्या आधारावर करणे सोपे होणार आहे. राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था (एनओटीटीओ) च्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय नोंदणीमध्ये हात प्रत्यारोपणाची नोंदणी करता येईल. देशपातळीवरील या सुविधेमुळे हाताचे दान करण्याच्या आणि त्याच्या योग्य वापराच्या मोहिमेला आणखी बळ मिळेल, असे डॉ. सुब्रमण्यम अय्यर यांनी म्हटले.
अय्यर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या चमूनेच २०१५ साली देशात पहिल्यांदा हात प्रत्यारोपण पार पाडले होते. एनओटीटीओचे संचालक अनिल कुमार यांनी नुकतेच नोंदणी प्रक्रियेबाबत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले होते. सर्व हात प्रत्यारोपण केंद्र आणि रुग्णालयांत यासंबंधीची माहिती पाठवत त्यांना त्याचे पालन करण्याच्या सूचना देण्याचे आवाहन कुमार यांनी केले होते. यापूर्वी राष्ट्रीय संस्थेच्या संकेतस्थळावर हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता सर्च हात प्रत्यारोपण केंद्र आणि रुग्णालयांना हात प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णाची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे.
हात प्रत्यारोपणाच्या घटना वाढत असून, रुग्णालयांची संख्यादेखील वाढत चालली आहे. सद्यःस्थितीत देशभरात ९ रुग्णालये ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत आहेत. आतापर्यंत ३६ रुग्णांना हात मिळाले असून, एकूण ६७ हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. सामान्यतः ब्रेन डेडनंतर अवयव दान केले जाते; परंतु हाताचे दान हे ब्रेन डेड आणि हृदयविकाराचा झटका या दोन्ही स्थितीत केले जाऊ शकते, असे डॉ. अय्यर यांनी स्पष्ट केले. हात हे ‘समिश्र ऊतक’च्या श्रेणीत येतात. जनजागृती वाढत चालल्याने आता हात गमावलेले अधिक अधिक रुग्ण पुढे येत असून, दात्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे.