नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेकडून आणखी ७३ हजार ‘एसआयजी ७१६’ रायफली मागवल्या आहेत. यामुळे भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे. भारताने या रायफल्ससाठी ऑर्डर दिल्याची माहिती शस्त्र बनविणाऱ्या अमेरिकन सीग सॉअर कंपनीने बुधवारी दिली. तसेच भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणात भागीदार होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे कंपनीने म्हटले.
भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) गतवर्षी डिसेंबरमध्ये आणखी ७३ हजार ‘एसआयजी ७१६’ रायफल्सच्या खरेदीला हिरवा कंदील दाखवला होता. भारतासोबत दुसऱ्यांदा खरेदी करार करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचे अमेरिकन शस्त्र उत्पादक कंपनीने म्हटले. यापूर्वी भारताने २०१९ साली ७२,४०० ‘एसआयजी ७१६’ रायफली मागवल्या होत्या. तर नवीन खरेदी पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या हातात एकूण १,४५,४०० रायफली असतील. भारतीय सैन्याकडून या रायफल्सला जबरदस्त प्रतिसाद मिळला आहे.
नवीन खरेदी ही त्याचेच फलित आहे. भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नात भागीदार झाल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रॉन कोहेन यांनी कराराची माहिती देताना म्हटले. आधुनिक अशा या रायफलमुळे भारतीय सैन्याचे हात आणखी बळकट होणार आहेत. पहिल्या खरेदीनुसार आलेल्या ७२,४०० रायफलींचे अगोदरच सैन्यांमध्ये वाटप करण्यात आले आहे. ‘एसआयजी ७१६’ रायफल्स या हळूहळू स्वदेशी बनवाटीच्या इन्सास रायफलची जागा घेत आहेत. १९९३ मध्ये सैन्याला देण्यात आलेल्या इन्सास रायफल्सने १९९९ च्या कारगिल युद्धात महत्त्वाची भमिका पार पाडली होती