नवी दिल्ली: देशात आढळलेल्या एमपॉक्सचा संशयित रुग्ण हा रुग्णालयात देखरेखीखाली असून, घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे सरकारने म्हटले आहे. संबंधित रुग्णाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून, चिंतेचे कारण नाही. त्याला एमपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी करण्यासाठी त्याचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित रुग्णाने नुकतेच एमपॉक्सच्या संसर्गाचा सामना करत असलेल्या देशाचा प्रवास केला होता. संशयित रुग्णावर निर्धारित प्रोटोकॉलनुसार उपचार केले जात आहेत.
त्याचबरोबर संभाव्य स्रोताचादेखील शोध घेत देशात होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन केले जात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. हे प्रकरण राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (एनसीडीसी) यापूर्वी दिलेल्या जोखीम मूल्यांकनाशी सुसंगत आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. अशा प्रकाराच्या स्थितीला हाताळण्यासाठी देश सज्ज असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यापूर्वीच एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
यापूर्वी डब्ल्यूएचओने २०२२ साली असा इशारा दिला होता. तेव्हापासून भारतात एमपॉक्सचे ३० रुग्ण आढळले आहेत. देशात शेवटचा रुग्ण यंदा मार्च महिन्यात आढळला होता. यंदा आफ्रिकन देशात या आजाराने जोरदार थैमान घातला आहे. आतापर्यंत १५,६०० हून अधिक रुग्ण आढळले असून, ५३७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.