दिल्ली: जगात अनेक देशात कोरोनानंतर आता मंकीपॉक्सच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. भारतात आरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. अशातच मंकीपॉक्स (MPox) च्या क्लेड 1 स्ट्रेनचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली हीच परिस्थिती आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात यूएईमधून केरळला परतला होता.
केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे वय 38 आहे. 17 सप्टेंबर रोजी त्यांनी मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यानंतर स्वत:ला क्वारंटाइन केले. घातक विषाणूजन्य संसर्गाची बाधा झाली असली तरीही केरळमधील या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात येत आहे.
याआधी 9 सप्टेंबर रोजी देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सच्या संशयावरून 8 सप्टेंबर रोजी अलग ठेवण्यात आले होते. नमुने घेतले आणि तपासले गेले, ज्यामध्ये मंकीपॉक्स स्ट्रेन क्लेड 2 (क्लेड 1 नाही) ची पुष्टी झाली.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, कानामागील काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला येणे.
काय आहे हा एमपॉक्स संसर्ग?
एमपॉक्स हा एक व्हायरल जुनोटिक आजार असून, त्याचा प्रादुर्भाव संक्रमित जखम, कपडे किंवा तत्सम गोष्टींच्या संपर्कात आल्यामुळं फोफावतो. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनंही हा प्रादुर्भाव (PHEIC) म्हणजेच आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित करण्यात आल्यामुळं यंत्रणा त्याबाबत सतर्कता बाळगताना दिसत आहेत. 2022 मध्ये पहिल्यांदाच या संसर्गामुळं रुग्णसंख्या वाढत असल्याची बाब लक्षात आली असून 2024 मध्येही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं जागतिक स्तरावर सदर बाबतीत अतिदक्षता बाळगली जात असल्याचं चित्र आहे.