नवी दिल्ली: देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. एक दिवस आधी दिल्लीतील या संशयित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्यात आले होते. आता त्याच्या नमुन्याची चाचणी केल्यानंतर त्यात एमपॉक्स विषाणू असल्याची पुष्टी झाली आहे. हा रुग्ण नुकताच परदेशातून भारतात परतला आहे. सध्या रूग्णाला रूग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये कडक निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि लोकांना घाबरू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णावर संपूर्ण प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात उपचार केले जात आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारे विषाणू पसरण्याचा धोका नाही. यासोबतच आरोग्य विभाग त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवत असून त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे.