पुणे : देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या टोलवाढीला स्थगिती दिल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजपासून (सोमवार, 3 जून 2024) देशभरातील रस्ते टोल दरात तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच आता नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणे महाग पडणार आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गावरील टोल दरात वाढ होत आहे.
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. हा दरवर्षीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. ही दरवाढ आधीच होणार होती, मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. यामुळे टोल दरवाढ निवडणूक काळात रोखण्यात आली होती. आता 3 जून 2024 पासून टोलच्या दरात 3 ते 5 टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येत आहे. सोमवारपासून देशभरातील 1100 टोल प्लाझावर टोल दरवाढ होणार आहे.
लोकसभा निवडणुका संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोलच्या दरात वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला खात्री लागणार आहे. वाढ टोलमुळे फळे आणि फळभाज्यांसह इतर गोष्टीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.