आंध्र प्रदेश : कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडलावल्लेरु अभियांत्रिकी महाविद्यालयातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाविद्यालयातील मुलींच्या हॉस्टेलमधील स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थीनींनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.
मुलींच्या हॉस्टेलमधील स्वच्छतागृहातील छुप्या कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. वसतिगृहाच्या आवारात पोलिसांना कोणतेही छुपे कॅमेरे सापडले नसून तपास सुरू असल्याची माहिती गुदलावल्लेरूचे पोलीस उपनिरीक्षक सत्यनारायण यांनी माध्यमांना दिली.
आरोपीला अटक
या प्रकरणातील आरोपी विजय नावाच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपी विजयचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी जवळपास 300 अश्लील व्हिडिओ जप्त केले आहे. आरोपी विजय हा याच कॉलेजमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. विजयने इतर विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ विकले असावेत असा पोलिसांना संशय आला आहे.
SHOCKING
Hidden camera found in girls’ hostel washroom in #Gudlavalleru Engineering College, #Gudivada, #Krishna dist, #AndhraPradesh (Aug 29)
-Reportedly over 300 videos were recorded & sold to boys in the hostel#FindingJusticeInIndia pic.twitter.com/Lf51l6OoJn— ravi dhakad (@rokrrish45) August 30, 2024
ही घटना कशी उघडकीस आली?
काल गुरुवारी काही विद्यार्थीनींनी वसतिगृहात असलेल्या स्वच्छतागृहात लपवलेला कॅमेरा पाहिला. याची सूचना त्यांनी तत्काळ प्रशासनाला दिली. या घटनेनंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात एकत्रित येऊन आंदोलन सुरू केलं. आज, शुक्रवारी सकाळपर्यंत महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचे अजुनही आंदोलन सुरूच होते.
दरम्यान याप्रकरणात विद्यार्थीनींनी ‘आम्हाला न्याय हवा’ आणि ‘दोषींवर कारवाई करा, आम्हाला महाविद्यालयाच्या आवारात सुरक्षा द्या’ अशा घोषणा यावेळी दिल्या आहेत.