इंदौर: मध्यप्रदेशच्या इंदौरमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) जवानांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित विशेष बूट तयार केले आहेत. या बुटांचे वैशिष्ट्य म्हणजे हे घालून चालताना प्रत्येक पावलागणिक वीज तयार होईल. तसेच जवानांचे सद्यःस्थितीतील लोकेशन देखील समजू शकेल.
आयआयटी इंदौरने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) अशा बुटांच्या दहा जोडांची पहिली खेप दिली आहे. आयआयटीतील प्राध्यापक पलानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बूट विकसित करण्यात आले आहेत. ट्राइबो-इलेक्ट्रिक नैनोजेनरेटर (टेंग) तंत्रज्ञानाचा उपायोग बुटांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हे बूट घालून चालताना प्रत्येक पावलागणिक विजेची निर्मिती होईल. ही वीज बुटांच्या तळाशी बसविण्यात आलेल्या एका यंत्रात साठवली जाईल. याचा वापर लहान उपकरण चालविण्यासाठी केला जाऊ शकतो. ‘ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम’ (जीपीएस) आणि ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरए फआयडी) तंत्रज्ञानाचा देखील बुटांमध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीतील जवानांच्या लोकेशनची माहिती मिळू शकेल.
या अनोख्या बुटांमुळे सैनिकांची सुरक्षा, समन्वय आणि सतर्कता आणखी मजबूत होईल, असा विश्वास आयआयटी इंदौरचे संचालक सुहास जोशी यांनी व्यक्त केला. टेंग तंत्रज्ञानावर आधारित या बुटांचा वापर स्मृतिभ्रंश आजाराने त्रस्त वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी आणि गिर्यारोहकांच्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय, या बुटांचा वापर कारखान्यात कामगारांची हजेरी आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी करता येईल. खेळांडूच्या पायाच्या हालचालींचे अचूक विश्लेषण करत त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी हे बूट फायदेशीर ठरू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.