रोहतक : हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मदिना गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने मोबाईल हॉटस्पॉट सुरु करण्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. या हत्येची माहिती मिळताच बहू अकबरपूर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता आरोपीने रागाच्या भरात हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवले.
बहूअकबरपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ महेश कुमार यांनी सांगितले की, 30 जुलै रोजी त्यांना घरगुती वादातून एका तरुणाने पत्नीची हत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मदिना येथे राहणारा अजय कुमार हा आपल्या पत्नीसोबत घरी मोबाईल वापरत असल्याचे आढळले. अचानक त्यांच्या मोबाईलचा डेटा संपला, त्यानंतर त्यांनी पत्नी रेखाला तिच्या मोबाईलचे हॉटस्पॉट सुरु करण्यास सांगितले. पण, पत्नीने हॉटस्पॉट सुरू करण्यास नकार दिला.
पत्नी रेखाने सांगितले की, तिच्याकडेही कमी मोबाइल डेटा शिल्लक आहे. त्यामुळे ती नेट देणार नाही. त्यानंतर रागाच्या भरात अजयने पत्नी रेखाची धारदार शस्त्राने हत्या केली आणि तेथून पळ काढला. रेखाच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू केला असता रेखाचा धारदार शस्त्राने खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अजयला मदिना गावातूनच अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.