टोकियो: नात्यात एकमेकांची काळजी घेतली जाते. पती किंवा पत्नीने दिवसातून अनेक वेळा एकमेकांना फोन करणे सामान्य आहे. मात्र, जपानमधील एका व्यक्तीने असे काही केले की, ते ऐकून तुमचा कानावर विश्वास बसणार नाही. हा व्यक्ती पत्नीला दिवसातून शंभरपेक्षा जास्त कॉल करत होता. इतकेच नव्हे तर तो अनेक वेळा नवीन नंबरवरून कॉल करायचा व कॉल उचलल्यानंतर बोलायचाच नाही. ऑडिटी सेंट्रल रिपोर्टनुसार जपानच्या अमागासाकी येथील एक ३८ वर्षांचा व्यक्ती पत्नीला दिवसातून शेकडो वेळा फोन करत होता. पत्नीने फोन उचलला, तर तो बिलकूल बोलायचा नाही.
अनेक आठवडे हा प्रकार सुरू होता. अनोळखी नंबरवरून फोन येत असल्याने पत्नीला चिंता वाटू लागली. घरी असतानाही तिला कॉल येत होते. मात्र, पती जेव्हा झोपलेला असायचा, तेव्हा एकही कॉल येत नव्हता. त्यामुळे तिला पतीची शंका आली. याचा शोध घेण्यासाठी तिने पोलिसांची मदत घेतली. तपासात पतीच कॉल करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी पतीला अॅण्टी स्टॉकर लॉचे उल्लंघन केल्याने अटक केली.
काय तर म्हणे पत्नीवर खूप प्रेम !
तो असे का करत होता? यावर त्याने सांगितले की, त्याचे पत्नीवर खूप प्रेम आहे. त्यामुळेच तो तिला जास्त कॉल करत होता. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांना आश्चर्य वाटले. अशा पद्धतीने कुणी प्रेम व्यक्त करते का? असा प्रश्न युजर्सनी केला.