नवी दिल्ली: आपण किती काळ जगू शकतो, यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन संशोधन केले आहे. फ्लेवर इंडेक्स या चाचणीतून तुम्ही किती दिवस जगू शकता, याचा अंदाज लावता येतो. या चाचणीतून तुमची जीवनशैली आणि आरोग्याविषयी महत्वाची माहिती मिळते. ही चाचणी तुमच्या शरीराची लवचिकता आणि आरोग्याच्या स्थितीचे मूल्यांकन करते. जे तुमच्या वयाचा अंदाज लावण्यास मदत करू शकते. मात्र ही चाचणी केवळ अंदाज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीवनशैली आणि आरोम्याकडे लक्ष दिल्यास आयुर्मान वाढवता येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, ब्राझीलच्या संशोधकांनी ३ हजार १०० निरोगी मध्यवयीन लोकांचा अभ्यास केला. संशोधकांनी ‘फ्लेक्स इंडेक्स स्कोअर’ तयार केला. जो स्नायूंच्या जोडांची गतिशीलता मोजतो. अभ्यासात आढळून आले की, ज्या पुरुष आणि महिलांचे फ्लेक्स इंडेक्स स्कोअर कमी होते, त्यांना मृत्यूचा धोका जास्त असतो. काही प्रकरणांमध्ये ते पाचपट जास्त होते. संशोधकांना आढळले की, व्यायामामुळे शरीराची गतिशीलता सुधारते, ज्यामुळे आयुर्मान वाढू शकते. महिलांचा फ्लेक्स इंडेक्स स्कोअर पुरुषांपेक्षा ३५ टक्के चांगला होता. यामध्ये ६१ ते ६५ वयोगटातील महिला सहभागी झाल्या. सरासरी ४६ ते ५० वयोगटातील पुरुषांपेक्षा १० टक्के महिला आरोग्यात लवचिक होत्या.
व्यायाम महत्त्वाचा
संशोधकांनी ४६ ते ६५ वयोगटातील सहभागींची सलग तेरा वर्ष आरोग्यविषयक माहिती घेतली. या दरम्यानच्या काळात यातील १० टक्के म्हणजे ३०० जणांचा मृत्यू झाला. जे सहभागी जिवंत आहेत, त्यांचा लवचिकता स्कोअर मृत्यू झालेल्यांपेक्षा १० टक्के जास्त होता. इतर अनेक संशोधनात लवविकतेचा अभाव आणि अकाली मृत्यू याच्यातील संबंध आढळला आहे. ब्रिटनच्या फिटनेस प्रशिक्षकाने अलीकडे घरच्या घरी करता येतील, असे पाच व्यायाम सांगितले आहेत. या व्यायामातून तुमचे वय आणि आरोग्य कसे आहे, याचा अंदाज लावता येतो.