कोलार: कर्नाटकातील कोलार जिल्ह्यामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने मोठ्या थाटामाटात प्रेमविवाह केला आणि काही तासांनंतर त्याने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर त्याने याच कुऱ्हाडीने स्वतःवर वार केले, त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जवळच्या गावात राहणारे नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 7 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले. दोघांचे मित्र आणि नातेवाईक लग्नाला उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनीही कुटुंबासोबत वेळ घालवला.
यानंतर दोघेही चहा घेण्यासाठी नातेवाईकाच्या घरी गेले. यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, दोघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, नवीन याने लिखिता श्री हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि नंतर त्याच कुऱ्हाडीने स्वतःवर वार केले. यावेळी नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.
दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी लिखिता हिला मृत घोषित केले. नवीन गंभीर जखमी झाल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.