गुवाहाटी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला आसाम पोलिसांनी गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आहे. प्रत्यक्षात या यात्रेसोबत निघालेल्या सुमारे पाच हजार काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले तेव्हा त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गांधींविरोधात एफआयआरही नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या ताफ्याला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि बॅरिकेड्स तोडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. काँग्रेस समर्थकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी यापूर्वी सांगितले होते की, रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी यात्रेला शहरात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान खानापारातील गुवाहाटी चौकात मोठी गर्दी जमली असून राहुल गांधी यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी जितेंद्र सिंह म्हणाले, ‘आम्ही अडथळे पार करून विजय संपादन केला आहे.’
सोमवारी मेघालयात प्रवेश केल्यानंतर, यात्रा या विभागात शेवटच्या टप्प्यासाठी आसाममध्ये परतली, जी राज्याचे सर्वात मोठे शहर असलेल्या गुवाहाटीच्या बाहेरील भागातून जाईल. आसाममधील यात्रा गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे.