Ghazipur News : उत्तर प्रदेश येथील गाझीपूरमधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हायव्होल्टेज विजेची तार पडल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेकजण होरपळल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ही संपूर्ण घटना मरदह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाहर धामजवळ घडल्याची माहिती मिळत आहे
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या बसमध्ये 50 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. एका लग्नासाठी पाहुणेमंडळी जात होती. मात्र, ही बस कुठून येत होती आणि कुठे जात होती. त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, एका मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. बसमध्ये बरेच लोक होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच लोकांची मोठी गर्दी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.