चेन्नई: बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं मिचौंग चक्रीवादळ मंगळवार ५ डिसेंबरला तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर धडक देणार आहे. त्यापूर्वी तमिळनाडूच्या किनाऱ्यावर वेगवान वारे वाहू लागले असून मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाच्या वाऱ्यांचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका आहे. या चक्रीवादळामुळे पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. चक्रीवादळाने तमिळनाडूत तर अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि घरं पाण्याखाली बुडाली आहेत. उद्या येणाऱ्या चक्रीवादळा पूर्वीच तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसासह वेगवान वाऱ्यामुळे किनाऱ्या लगतच्या भागांमध्ये अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, रस्ते बंद आहेत. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याबरोबरच लोकांनी घरून काम करावं, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर चेन्नई विमानतळ बंद करण्यात आलं आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत ६ नागरिकांचा बळी घेतला आहे.