उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथ बस आणि पिकअपची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर 27 हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. ही घटना रविवार (दि. 18) रोजी सलेमपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच प्रवाशांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व मृत व्यक्ती अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तालुक्यातील रायपूर खास अहिर नागला या गावातील रहिवासी होते.
नेमकं काय घडलं?
अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तहसीलमधील रायपूर खास अहिर नागला गावातील 40 हून अधिक नागरिक गाझियाबादहून अलीगढला निघाले होते. हे लोक गाझियाबादच्या बुलंदशहर रोड बी-10 येथे असलेल्या एका खासगी कंपनीत काम करत होते. रविवारी सकाळी गाझियाबादहून पिकअपमधून सर्वजण आपल्या घरी निघाले होते.
त्यावेळी सलेमपूर पोलीस ठाणे हद्दीत समोरून येणाऱ्या खासगी बसने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, 27 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
10 people killed, 27 injured as pickup van collides with bus in Bulandshahr district of Uttar Pradesh: Official
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2024