Corona Update : नवी दिल्ली : देशात कोरोना JN.1 चा व्हेरिएंट आपली पाळेमुळे आणखी वेगाने पसरवत आहे. जगभरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. दररोज यात भर पडत आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना रूग्णाची देशातली आकडेवारी जाहीर केली आहे. भारतात कोविडचे 605 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4,002 वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे देशाता चार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये केरळमधील दोन, कर्नाटक आणि त्रिपुरामधील एकाचा रुग्णाचा समावेश आहे.
कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंता वाढल्य़ा आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १३९ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपासून एकूण 682 नवीन रुग्ण जेएन.1 उप-प्रकारचे आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात 199, केरळमध्ये 148, महाराष्ट्रात 139, गोव्यात 47, गुजरातमध्ये 36, आंध्र प्रदेशात 30, राजस्थानमध्ये 30, तामिळनाडूत 26, दिल्लीत 21, ओडिशात तीन, तेलंगणात एक आणि हरियाणात एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देभरातील राज्यांना श्वसनाच्या गंभीर आजाराच्या जिल्हावार प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरून वाढत्या प्रकरणांचा कल लवकर ओळखता येईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात येत आहेत. राज्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अनेक रुग्ण घरीच बरे होत आहेत. JN.1 उप-प्रकारामुळे मृत्युदरात काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. 2020 पासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला होता. देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्ये जवळपास चार वर्षांत 5.3 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे. आतापर्यंत देशात कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.