पुणे प्राईम न्यूज डेस्क: फ्लाइट इमर्जन्सी’ ऐकताच विमानात बसलेले लोक कल्पना करू लागतात की, नेमकं काय झाले असेल. याची काही कारणेही मनात येतात. जसे खराब हवामान, इंजिनवर पक्षी आदळणे, प्रवासी एकमेकांशी भांडणे इ. पण अमेरिकेत उवांमुले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला जात होते. विमानात एका प्रवाशाच्या केसात उवा आढळल्या होत्या, त्या त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या डोक्यातही गेल्या. या प्रवाशांनी फ्लाईटमध्ये एकच गोंधळ घातला. या कारणास्तव फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
ही घटना जून महिन्यात घडली होती, त्याचा तपशील आता समोर आला आहे. टिकटॉक कंटेंट क्रिएटर एथन जुडेल्सन यांनी ही घटना सांगितली आहे. द न्यूझीलंड हेराल्डच्या बातमीनुसार, एथन ज्युडेल्सनने एक छोटा व्हिडिओ बनवून आपले अनुभव शेअर केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या फ्लाइटला 12 तास उशीर झाला. विमानात बसलेल्या एका महिलेच्या केसात खूप उवा असल्याचे आढळल्याने त्यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
एथनने सांगितले की, “आमचे फ्लाइट न्यूयॉर्कला जात होते. त्यानंतर अचानक आमच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले. पण, केबिन क्रूने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. ते सर्व शांत दिसत होते. विमान फिनिक्स, ॲरिझोना येथे उतरले. प्रवासी दिसत होते. त्यांना उशीर झाला होता, तरीही ते विमानातून उतरत आहेत हे विचित्र वाटले.
व्हिडिओमध्ये एथन पुढे म्हणाले की, क्रू मेंबरने सांगितले की, फ्लाइटची उर्वरित माहिती तुम्हाला गेटवर दिली जाईल, परंतु तसे झाले नाही. गेटवर पुढील फ्लाइटची फक्त माहिती दिली गेली, जी 12 तासांनंतर होती. प्रवाशांना एक ईमेलही आला. ज्यात उशीर झाल्यामुळे या सर्वांना राहण्यासाठी हॉटेलची सोय आणि जेवणासाठी बारा डॉलर (सुमारे हजार रुपये) देण्याविषयीची माहिती होती. यादरम्यान एथनने सहप्रवाशांशी संवाद साधला. त्याला एका प्रवाशाकडून कळले की, इमर्जन्सी लँडिंगचे खरे कारण उवा या आहेत.
या प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, विमानातील एका महिलेच्या डोक्यात इतक्या उवा होत्या की, त्या बाहेर पडत होत्या आणि इतर प्रवाशांवर चढत होत्या. ही तीच महिला होती, जी लँडिंगच्या वेळी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. या व्यक्तीने सांगितले की, जेव्हा उवा इतर प्रवाशांच्या डोक्यात पोहोचल्या, तेव्हा त्याने हे विमानातील क्रू मेंबरला सांगितले. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
द न्यूझीलंड हेराल्डनुसार, अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने पीपल मॅगझिनला सांगितले की, 15 जून रोजी अमेरिकन एअरलाइन्सची फ्लाइट 2201 लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्ककडे जात होती. त्यानंतर प्रवाशांच्या ‘वैद्यकीय गरजा’मुळे विमान फिनिक्सच्या दिशेने वळवण्यात आले. अमेरिकन एअरलाइन्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही.