फतेहपूर : उत्तर प्रदेशमधील फतेहपूर इथल्या विकास द्विवेदी याला आता चक्क आठव्यांदा साप चावला आहे. त्यामुळे विकास संबंधित सर्पदंशाच्या घटनेचं गूढ वाढत जात आहे. विकासला सात वेळा सर्पदंश झाल्यावर वैद्यकीय विभागाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. सीएमओने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, विकास द्विवेदी हा स्नेक बाइट फोबियाचा बळी आहे.
‘मला आता आठव्यांदा साप चावला आहे,’ असा दावा उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर जिल्ह्याच्या मलवा पोलीस स्टेशन हद्दीतल्या सोरा गावातला रहिवासी असणाऱ्या विकास द्विवेदीनं केला आहे. संकटमोचक बजरंगबली दरबारात अर्थात दौसाच्या मेहंदीपूर बालाजी मंदिरात आठव्यांदा सर्पदंश झाल्याचं विकासने सांगितलं आहे. सर्पदंश टाळण्यासाठी विकासने मेहंदीपूर बालाजी मंदिरात आश्रय घेतला होता; पण तिथंदेखील त्याला सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पण नवव्या वेळेला सर्पदंश झाल्यावर त्याचा मृत्यू
तीन वेळा साप चावला तेव्हा त्यानंतर विकसाला एक स्वप्न पडल्याचा दावा त्याने केला आहे. आठ वेळा सर्पदंश झाल्यानंतर तो वाचेल; पण नवव्या वेळेला सर्पदंश झाल्यावर त्याचा मृत्यू होईल, असं सापानं विकासला स्वप्नात सांगितलं होतं, असं सांगितलं जात आहे. त्यातच आता विकासला आठव्यांदा सर्पदंश झाल्यानंतर विकाससह त्याच्या कुटुंबात भीतीचं वातावरण आहे.
विकासने दावा केला, की ‘सोमवारी बालाजी मंदिरात आरती सुरू असताना मला साप चावला. याबाबत माझ्या मामीला मी सर्वप्रथम माहिती दिली. बालाजी महाराजांच्या कृपेनं मला काही झालं नाही. मला कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवल्या नाहीत.’
पुन्हा साप स्वप्नात दिसला का किंवा काही जाणवलं का, असं विचारलं असता विकास म्हणाला, की ‘सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही अशुभ गोष्टी जाणवल्या. त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास माझे डोळे फडफडू लागले. याबाबत मी कुटुंबियांना माहिती दिली. मंदिराकडून मला सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. मला व्हीआयपी पास दिला गेला आहे.’
सीएमओच्या अहवालावर विकासने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर विकास म्हणाला कि, ‘सीएमओचा अहवाल चुकीचा आहे. मी तिथं नसताना सीएमओच्या पथकानं अहवाल कसा तयार केला?’
विकासच्या वडिलांना पडलं स्वप्न..
विकासचे वडील सुरेंद्र यांनी सांगितलं, की ‘या वेळी सर्पदंशानंतर काही त्रास जाणवला नाही. त्याचं पूर्ण शरीर आखडलं जात होतं; पण या वेळी असं झालं नाही. मला पहाटे पाच वाजता एक भीतिदायक स्वप्न पडलं. एक साप माझ्या मुलाला चावला आणि त्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचं मला स्वप्नात दिसलं.’
तर दुसरीकडे विकासच्या या गूढाविषयी संशय व्यक्त केला जात आहे. पहिल्यांदा सात वेळा सर्पदंश होऊनही त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले गेले नाहीत. जेव्हा मेहंदीपूर बालाजी मंदिरात त्याला आठव्यांदा साप चावल्याचा दावा केला गेला, त्यानंतर त्याच्यावर कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचार केले गेले नाहीत. त्यामुळे विकासच्या सर्पदंशांचं गूढ आणि संशय दोन्ही वाढत जात आहे.