हरियाणा: जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळ ८ मे २०२५ रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात हरियाणातील पलवल येथील शूर सैनिक लान्सनायक दिनेश कुमार शर्मा शहीद झाले. लान्सनायक दिनेश कुमार शर्मा शहीद झाल्याची बातमी ऐकल्यानंतर परिसरात शोककळा पसरली होती. गुरुवारी पलवल येथील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लान्सनायक दिनेश कुमार शर्मा यांच्या पत्नी सीमा यांना हि बातमी कळल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, सीमा या सात महिन्यांच्या गर्भवती आहेत. पतीचा मृतदेह गावात पोहोचला तेव्हा त्या फक्त, ‘मला एकदा त्यांच्याशी बोलू द्या, त्यांनी मला त्यांना फोन करायला सांगितले होते’ असे म्हणत होत्या.
दरम्यान, शेवटच्या वेळी बोलू न शकल्याबद्दल खंत असल्याचे पत्नी सीमा यांनी सांगितले आहे. माझ्या पोटातून जन्मलेला मुलगा देशासाठी कामी आला, याचा मला अभिमान आहे, असे दिनेश कुमार शर्मा यांच्या आईने रडत रडत सांगितले. दिनेश यांना काही काळापूर्वी लान्सनायक पदावर बढती देण्यात आली होती. तीन वर्षांनी ते निवृत्त झाले असते.