चंदीगड: हरियाणात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे. हरियाणात त्यांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तीन आमदार रोहतकमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांनी विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. आणखी एका अपक्ष आमदाराबाबत पाठिंबा काढून घेतल्याची चर्चा आहे.
या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष उदय भानही उपस्थित होते. नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारचा पाठिंबा काढून घेताना आमदारांनी वाढती महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आमदारांनी पाठिंबा काढून नायबसिंग सैनी सरकारला अडचणीत आणले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप सरकारने आपले बहुमत सिद्ध केले होते.
विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी तिन्ही आमदारांचे स्वागत केले आणि ते म्हणाले की, सध्याच्या सरकारबद्दल लोकांचा भ्रमनिरास झाला असून त्यांनी जनभावना लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे. योग्य वेळी घेतलेला हा योग्य निर्णय असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या बाजूने लाट जात आहे. जनभावनेचा आदर करत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
हुड्डा यांची राष्ट्रपती राजवटीची मागणी
हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारवर निशाणा साधत तीन आमदारांनी जनभावनेनुसार निर्णय घेतल्याचे सांगितले. काँग्रेसची लाट सुरू असून तेही या लाटेत हातभार लावतील, असं देखील म्हटलं आहे.
तीन अपक्ष आमदारांनी हरियाणा सरकारचा पाठिंबा काढून काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता, हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नायब सिंग सैनी म्हणाले की, मला ही माहिती मिळाली आहे. आमदारांच्या काही इच्छा असतात. काँग्रेस काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात मग्न आहे. आता काँग्रेसला जनतेच्या इच्छेशी काही देणे घेणे नाही.