चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करीत नशीब आजमावणाऱ्या १३ उमेदवारांची पक्षाने शुक्रवारी हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने या उमेदवारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाची शिस्त मोडण्याच्या प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी या उमेदवारांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी केल्याचे काँग्रेसने सांगितले. तसेच यापुढे पक्षविरोधी कारवाया व बंडखोरी खपवून घेणार नसल्याचे काँग्रेसने ठणकावले.
हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान यांनी सांगितले की, नरेश धांडे (गुहला-एससी), प्रदीप गिल (जींद), सज्जन सिंह ढुल व सुनीता बट्टन (पुंडरी), राजीव मामूराम व दयाल सिंह सिरोही (नीलोखेडी-एससी), विजय जैन (पानिपत ग्रामीण), दिलबाग सांडिल (उचाना कला), अजित फोगाट (दादरी), अभिजीत सिंह (भिवानी), सतबीर पतेरा (बवानी खेडा-एससी), नीटू मान (पृथला) आणि अनिता ढुल बडसीकरी (कलायत) यांना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने हे १३ उमेदवार नाराज होते, पहिल्यांदा पक्षश्रेष्ठीनी त्यांची समजूत काढली. परंतु, तरीही त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत ६ वर्षांसाठी निलंबित केल्याचे उदय भान यांनी सांगितले. पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री संपत सिंह यांनी नलवा मतदारसंघातून आपला अर्ज मागे घेतला आहे. तर आणखी एक नेता राम किशन ‘फौजी’ यांनी बवानी खेडा मतदारसंघातून आपले नामांकन मागे घेतले आहे. यासोबतच अंबाला सिटी मतदारसंघातील उमेदवार तथा माजी मंत्री निर्मल सिंह यांच्या विरोधात लढणारे माजी आमदार जसबीर मलौर यांनीही रिंगणातून माघार घेतली. पण निर्मल सिंह यांची कन्या चित्रा सरवारा अंबाला कैंट मतदारसंघातून मैदानात आहे.