चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला वारंवार पॅरोल मंजूर केल्याप्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कठोर भाष्य केले आहे. भविष्यात राम रहीमला न्यायालयाच्या परवानगीशिवाय पॅरोल देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. राम रहीमचा पॅरोल 10 मार्च रोजी संपत आहे आणि त्याच दिवशी त्याला शरण येण्यास सांगण्यात आले आहे.
हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने हरियाणा सरकारला डेरा मुखी राम रहीमसारख्या इतर किती कैद्यांना अशाच प्रकारे पॅरोल देण्यात आला, हे सांगण्यास सांगितले. हायकोर्टाने हरियाणा सरकारकडून माहिती मागवली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीवेळी माहिती द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राम रहीमला देण्यात येत असलेल्या पॅरोलला एसजीपीसीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एसजीपीसीने सांगितले की, राम रहीमवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यात त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. असे असतानाही हरियाणा सरकार त्याला पॅरोल देत आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे राम रहीमला दिलेला पॅरोल रद्द करण्यात यावा.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग, जो बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तुरुंगात होता. त्याला 19 जानेवारी रोजी 50 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला होता. यापूर्वी त्याला नोव्हेंबर 2023 मध्ये 21 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला होता. यानंतर तो गेल्या वर्षी 21 नोव्हेंबरला हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगातून बाहेर आला होता. 2023 मध्ये राम रहीमची तुरुंगातून सुटका झालेली ही तिसरी वेळ होती.
यापूर्वी 30 जुलै रोजी डेरा प्रमुख 30 दिवसांच्या पॅरोलवर सुनारिया तुरुंगातून बाहेर आला होता. यापूर्वी त्याला जानेवारीत ४० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये त्याला 40 दिवसांचा पॅरोलही देण्यात आला होता. ऑक्टोबर पॅरोलपूर्वी तो गेल्या वर्षी जूनमध्ये एक महिन्याच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. याशिवाय 7 फेब्रुवारी 2022 पासून त्याला तीन आठवड्यांसाठी पॅरोल देण्यात आला होता. राम रहीम सिंगला त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. 2021 मध्ये मॅनेजर रणजित सिंगच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यासह इतर चार जणांनाही दोषी ठरवण्यात आले होते.