गाझियाबाद : सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात.
या रिल्सच्या नादात अनेकदा अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत. आता उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. बाल्कनीत रील बनवताना 16 वर्षीय मुलगी सहाव्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका सोसायटीच्या सहाव्या मजल्याच्या बाल्कनीत ती तरुणी रील बनवत होती. रिल बनवताना तिच्या हातातून फोन निसटला. त्यावेळी फोन पकडण्याच्या प्रयत्नात ती स्वत: खाली पडली. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी जमीनीवर पडली आहे.
अनेक जण तरुणीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतानाच तरुणीच्या आईने तिच्यावर चिडून तिला शिवीगाळ करत आहे. व्हिडिओत तरुणी वेदनेने ओरडत आहे आणि तिच्या वडिलांना कॉल करण्यास सांगत आहे. तरुणी रुग्णालयात पोहोचली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
UP के गाजियाबाद ई इंदिरापुरम सोसाइटी में 16 वर्ष की मोनिशा अपने फ्लैट की बालकनी में खड़ी होकर अपने मोबाइल से #insta वीडियो रील्स शूट कर रही थी। तभी उसके हाथ से मोबाईल छूट गया, जिसको पकड़ने के चक्कर मैं वह 6th फ्लोर से नीचे गिर गई। गंभीर हालत में उसे अस्पताल में भर्ती कराया गया।… pic.twitter.com/n054rSX0AQ
— TRUE STORY (@TrueStoryUP) August 13, 2024
घटनास्थळी तरुणीची आई बोलत आहे की, ‘तू माझे ऐकले नाहीस, तू खूप नालायक मुलगी आहेस. आई-वडिलांचे नाव खराब केले.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर लोकांचे रील्स बनवण्याचे वेड इतके वाढले आहे की, ते यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी रील बनवावी लागली तरी ती सुरक्षित करा, अशा चुका करू नका, ज्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो.