पुणे: नियमित कॉलेजमध्ये उपस्थित राहणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाला B.Com आणि MCA हे दोन अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेवर मर्यादा नसल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार आहेत.

नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे नियमित शिक्षण घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या वेळेनुसार घरातूनच अभ्यास करता येईल. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाइन शिक्षणाचा हा पर्याय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

YCMOU कडून ऑनलाइन शिक्षणाची तयारी गेल्या 2 वर्षांपासून सुरू होती. अभ्यासक्रमातील क्रेडिटनुसार व्हिडीओ लेक्चर्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्रेडिटसाठी सुमारे 150 व्हिडीओ उपलब्ध करून दिले जाणार असून, एका व्हिडीओचा कालावधी साधारण 7 ते 10 मिनिटांचा असेल.

ऑनलाइन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग कायम राहावा यासाठी विशेष पद्धत वापरण्यात येणार आहे. एखादा व्हिडीओ पूर्ण केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न सोडवावे लागतील. ते प्रश्न सोडवल्यानंतरच पुढील व्हिडीओ पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान मार्गदर्शन मिळावे यासाठी मेंटॉरची सुविधाही उपलब्ध असेल. प्रत्येक 100 विद्यार्थ्यांसाठी 1 मेंटॉर नियुक्त केला जाणार आहे. WhatsApp ग्रुप आणि ई-मेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासोबतच त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. प्रॉक्टर-बेस्ड परीक्षा प्रणालीद्वारे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
B.Com आणि MCA सोबतच YCMOU ला यापूर्वी BCA आणि MBA हे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता मिळाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.







