पॅरिस: 300 हून अधिक भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारे विमान फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते आणि ते निकारागुला जात होते. वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मानवी तस्करीच्या संशयावरून हे विमान फ्रान्समध्ये थांबवण्यात आले आहे.
पॅरिसच्या सरकारी अभियोजक कार्यालयाने सांगितले की, प्रवासी मानवी तस्करीला बळी पडू शकतात या अज्ञात टिपेनंतर गुरुवारी (21 डिसेंबर) विमान थांबवण्यात आले. अभियोजक कार्यालयाने सांगितले की, राष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधी युनिट जुनाल्कोने तपास हाती घेतला आहे.
मार्नेच्या ईशान्य विभागातील प्रांताने सांगितले की, रोमानियन कंपनी लीजेंड एअरलाइन्सद्वारे चालवलेले A340 विमान लँडिंगनंतर वैट्री विमानतळावर उभे राहिले. विमानात इंधन भरणे बाकी होते आणि विमानात 303 भारतीय नागरिक होते.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, पॅरिसच्या अभियोजक कार्यालयाने सांगितले की, संघटित गुन्हेगारीमध्ये विशेषज्ञ असलेले एक युनिट मानवी तस्करीच्या संशयाचा तपास करत आहे आणि चौकशीसाठी दोन लोकांना अटक केली आहे. रोमानियन चार्टर कंपनी लीजेंड एअरलाइन्सद्वारे चालवलेले हे उड्डाण गुरुवारी दुपारी तांत्रिक थांब्यासाठी लहान वैट्री विमानतळावर उतरले होते तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप केला, असे मार्ने प्रांत कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच कार्यालयाने सांगितले की, वैट्री विमानतळावरील रिसेप्शन हॉलचे प्रवाशांसाठी स्वतंत्र बेड असलेल्या वेटिंग एरियामध्ये रूपांतर करण्यात आले आहे.