ब्रिटन : ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना घरगुती मदतनीसांचे शोषण केल्याप्रकरणी स्विस कोर्टाने शुक्रवारी साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्यांच्यावरील नोकरांची तस्करी करण्याचा आरोप मात्र न्यायालयाने फेटाळला. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा आणि त्यांच्या पत्नीसह मुलगा आणि सून यांच्यावर नोकरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापैकी बहुतेक निरक्षर भारतीय होते, जे जिनिव्हा येथील त्यांच्या आलिशान व्हिलामध्ये काम करत होते.
जिनिव्हा शहरात हिंदुजा कुटुंबाचे लेकसाइड व्हिला आहे. त्या व्हिलामध्ये त्यांनी एका भारतीय महिलेला कामावर ठेवले होते. तिला अत्यंत कमी पगार दिला. एवढचं नाही तर ती दुसरीकडे जाऊ नये यासाठी तिचा पासपोर्टही त्यांनी जप्त केला होता. सतत 18 तास त्या महिलेकडून हे हिंदुजा कुटुंब काम करून घेत होते. त्या महिलेला त्यांनी फक्त 7 स्विस फ्रँक (सुमारे 6.19 पाउंड) दिले.
कुटुंबाच्या या अत्याचाराविरोधात सदर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये महिलेने म्हटल आहे की, नोकरांच्या पगारापेक्षा हिंदुजा कुटुंब त्यांच्या कुत्र्यांवर जास्त पैसे खर्च करत आहे. त्यांच्या पाळीव कुत्र्यावर दरवर्षी 8,584 फ्रँक (7,616 पाउंड) खर्च करत असल्याचा दावा या महिलेने केला आहे.
दरम्यान, हे प्रकरण कोर्टात गेल्यावर कोर्टाने हिंदुजा कुटुंबाला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि अनधिकृत रोजगार पुरवल्याबद्दल दोषी ठरवले. तसेच कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करणे, त्यांना स्विस फ्रँक्सऐवजी रूपयांमध्ये पैसे देणे, त्यांना व्हिला सोडण्यापासून रोखणे आणि त्यांना स्वित्झर्लंडमध्ये जास्त तास काम करण्यास भाग पाडणे या आरोपाखाली कुटुंबाला दोषी ठरवण्यात आले असून साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.