तिरुपती : आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) च्या व्यंकटेश्वर अन्नप्रसादम ट्रस्टला हैदराबादच्या चार उद्योजकांनी ३.७ कोटींचे दान दिले आहे. या ट्रस्टकडून भाविकांना मोफत भोजन उपलब्ध करून दिले जाते. उद्योजक पी. व्यंकटेश्वरलू, राजामौली, प्रसाद राव आणि एम. लक्ष्मी कुमारी यांनी तिरुमालाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सी.एच. व्यंकैय्या चौधरी यांच्याकडे ३.७ कोटी रुपयांचा धनादेश दिला.
माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव (एनटीआर) यांनी १९८५ मध्ये व्यंकटेश्वर नित्य अन्नदानम योजनेची घोषणा केली होती. याद्वारे दररोज दोन हजार भाविकांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले जात होते. नंतर या योजनेचे रूपांतर १९९४ मध्ये एका स्वतंत्र ट्रस्टमध्ये आणि नंतर २०१४ साली श्री व्यंकटेश्वर अन्नप्रसादम ट्रस्टमध्ये रूपांतरित करण्यात आले. जगभरातून मिळणाऱ्या देणग्या ट्रस्टकडून राष्ट्रीय बँकेत जमा केल्या जातात. यावर मिळणाऱ्या व्याजावर भक्तांसाठी मोफत अन्नदान योजना राबवली जाते.