नवी दिल्ली : देशाचे माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 95 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी मंत्री नटवर सिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचारही सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली.
नटवर सिंह यांनी 2004-05 दरम्यान UPA-I सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही काम केले आणि 1966 ते 1971 या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात ते संलग्न होते.
नटवर सिंह यांचा जन्म 16 मे 1931 रोजी राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव कुंवर नटवर सिंह होते आणि ते राजघराण्यातील होते. त्यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि केंब्रिज विद्यापीठातून झाले. त्यानंतर ते भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) रुजू झाले आणि 1953 मध्ये त्यांनी सेवा सुरू केली.
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने नटवर सिंह यांना 1984 मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नटवर सिंह यांनी अनेक पुस्तके आणि आठवणी लिहिल्या आहेत. त्यांचे ‘वन लाइफ इज नॉट इनफ’ हे आत्मचरित्र खूप लोकप्रिय आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांचे जीवन आणि राजकीय अनुभव याबद्दल तपशीलवार लिहिले आहे.