नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना दिल्लीतील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अडवाणी यांना मंगळवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. अडवाणी यांना गेल्या ४० दिवसांत तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सलग दुसऱ्यांदा अपोलोमध्ये दाखल
तीन जुलै रोजी लालकृष्ण अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ.विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. विनीत सुरी हे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट आहेत. मात्र, त्यावेळी अडवाणींच्या आजाराबाबत फारशी माहिती देण्यात आली नव्हती.
तत्पूर्वी, माजी उपपंतप्रधान अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना २६ जून रोजी रात्री १०.३० वाजता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या युरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्रभर तेथेच निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
एम्समध्ये युरोलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अडवाणी यांची तपासणी केली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी (२७ जून) त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर काही वेळाने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अडवाणींना एम्समध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा आरोग्यमंत्री जेपी नड्डा त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. 96 वर्षांचे अडवाणी यांचे वय लक्षात घेऊन त्यांच्या निवासस्थानी एका सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. यापूर्वी 2015 मध्ये अडवाणी यांना पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला होता.