Crime News : पतीने चहा मागितला म्हणून बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात घातली कात्री घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात घडली आहे. यानंतर आरोपी पत्नी घटनास्थळावरुन फरार झाली. तर दुसरीकडे पती रक्तबंबाळ अवस्थेत घऱी पडला होता. अंकित असं पीडित पतीचं नाव आहे.
नवऱ्याला चहाची तलप झाली. म्हणून त्याने पत्नीला चहा मागितला. पण पत्नीने चहा देण्यास नकार दिलं. यावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट पतीच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या धक्कादायक प्रकाराची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार चर्चा होत आहे. हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणाने घडला, याबाबत स्पष्ट माहिती नाही, पण प्रथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये चहावरुन वाद झाला होता असं समजतंय.
तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरुन भांडणं सुरु झाली होती. अंकितच्या पत्नीने तर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. विशेष म्हणजे या घटनेच्या तीन दिवस आधीच ही तक्रार दाखल कऱण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारीत तिने पती आणि सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता.
वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट्सनुसार पतीने पत्नीकडून चहा मागितला. पत्नीने चहा देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पत्नीने पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसली. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पत्नी फरार झाली आहे. याप्रकरणी पती अंकितने पत्नी प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बरुत पोलिसांनी प्रियांकाविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच, तिचा शोधही सुरू करण्यात आला आहे.
नेमकं काय घडल?
उत्तर प्रदेशमधील बडोली रोड येथील अंकित याचे तीन वर्षांपूर्वी रामाळा पोलीस ठाणे हद्दीतील सूप गावात राहणाऱ्या प्रियंकाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं होतं, मात्र गेल्या दीड वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, मारामारी सुरू होती. बुधवारी तरुणाने पत्नीला चहा मागितला असता पत्नीने रागाच्या भरात कात्री उचलून पती अंकितच्या डोळ्यात खुपसली. त्यामुळे अंकितला रक्तस्त्राव होऊन तो जमिनीवर पडला. आवाज ऐकून तरुणाच्या वहिनी आणि मुलांनी तेथे धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तरुणाची पत्नी घरातून पळून गेली. जखमी अंकित याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.