मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक अत्यंत लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. दोन महिलांना बेदम मारहाण करून जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन्ही महिलांना कमरेपर्यंत जमिनीखाली गाडल्याचे दिसत आहे. तसेच ट्रकमधून या महिलांवर मुरूम टाकला जात आहे.
ही घटना मंगवा पोलीस स्टेशन हद्दीतील हिनोटा जोरोट गावात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिला रस्ता बांधकाम करण्यासाठी विरोध करत होत्या, असे पोलिसांनी सांगितले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकच्या मागे दोन महिला बसल्या असून त्यांच्या अंगावर माती टाकण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेबाबत एसपी विवेक लाल यांनी सांगितले की, ममता पांडे आणि आशा पांडे या रस्त्याच्या बांधकामाला विरोध करत होत्या. त्यामुळे त्यांना जमिनीत अर्धे गाडले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.
तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले आहे की, हिनौता गावात जमिनीवरून दोन पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. वृत्तानुसार, शनिवारी राजेश सिंह नावाचा व्यक्ती रस्ता बांधण्यासाठी जेसीबी आणि मातीने भरलेला डंपर घेऊन या जमिनीवर पोहोचले. मात्र, आशा पांडे आणि ममता पाडे यांनी ही जमीन आपली असल्याचा दावा करत या दोन्ही महिला या बांधकामाला विरोध करण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे इतर पक्ष नाराज झाल्याने काही आरोपींनी महिलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना मातीने झाकून जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला.