गुजरात : गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत वीस जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन खाक झाला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग विझल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही प्रशासनाला बचाव आणि मदतकार्य हाती घेऊन जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. आगीचे कारण काय आहे याचा आम्ही तपास करत आहोत. यासोबतच शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राजकोट पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, या आगीच्या घटनेतून १० हून अधिक जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव म्हणाले की, टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली होती. बचावकार्य अद्याप सुरू आहे. आम्ही शक्य तितके मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सुमारे २० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हा गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे. निष्काळजीपणा आणि मृत्यू झाल्याबद्दल आम्ही गुन्हा नोंदवणार आहोत. आम्ही येथे बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास केला जाईल, असे पोलिस आयुक्त राजू भार्गव म्हणाले.