मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता कागदी नोटांना पर्याय म्हणून ‘पॉलिमर’ च्या नोटा चलनात आणणार असल्यामुळे ‘फाटकी नोट नको’ असा वाद घालण्याची वेळ इतिहासजमा होणार आहे. मुंबई आणि पाटणा येथे झालेल्या आरबीआयच्या बोर्ड बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. पॉलिमर नोटांचे आयुष्य कागदी नोटांच्या तुलनेत कैक पटीने जास्त असते. या नोटा सहजासहजी फाटत नाहीत आणि पाण्यातही खराब होत नाहीत. कागदी नोटा लवकर खराब होत असल्याने त्यांच्या छपाईवर आणि विल्हेवाटीवर होणारा खर्च खूप मोठा आहे. यावर उपाय म्हणून ‘पॉलिमर’ च्या नोटा आणणार असल्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, 2025 या वर्षात बाजारातून तब्बल 23.8 अब्ज खराब नोटा परत घ्याव्या लागल्या, ज्यामध्ये 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक होते. दरम्यान, ‘पॉलिमर’ च्या नोटांच्या निर्मितीचा खर्च सुरुवातीला काहीसा जास्त वाटू शकतो, पण दीर्घकालीन विचार केल्यास कागदी नोटांच्या तुलनेत यांचा छपाई खर्च बराच कमी येतो.

डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होऊनही सध्या चलनात असलेल्या एकूण चलनात वार्षिक 11.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, देशातील सध्याची एटीएम मशीन्स देखील या नवीन नोटा वितरीत करण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे बँकिंग रचनेत मोठा बदल करण्याची गरज भासणार नाही. हे सर्व पाहता, अधिक सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या प्लास्टिक नोटा चलनात आणणे हा आरबीआयचा एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.







